नागपूर : घरगुती वादातून मामेभाऊ आणि आतेभाऊ यांच्यात जीवघेणा हल्ला झाला. एकमेकमेकांचे तोंडही बघायचे नाही अशा टोकावर हे संबंध पोहोचल्याने दोन दिवसांपूर्वी गुजरातवरून नागपूरला आलेल्या मामेभावाने आतेभावाला एकट्यात गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत पळून गेला. गंभीर जखमी आतेभावावर मेयो रुगालयात उपचार सुरू आहेत. अरविंद चंद्रकुमार वर्मा (२०) जखमीचे तर कमलेश राजू वर्मा (२२) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालनगर, डिप्टी सिग्नल येथे दोन्ही कुटुंब आजुबाजुला राहतात. आरोपी कमलेश आणि जखमी अरविंद दोघेही हातमजुरीची कामे करतात. दोन्ही भावांमध्ये आधीपासूनच आपसात पटत नव्हते. अनेकदा त्यांच्यात शाब्दिक वाद आणि हाणामारीही झाली. प्रकरण पोलिसात गेल्याने डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला आणि २६ डिसेंबरला तो बेलवर सुटला होता. यानंतर अरविंद गुजरातला त्याच्या भावाकडे राहायला गेला.
मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी तो नागपूरला आला. अरविंद आल्याचे कळताच जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी कमलेशने त्याच्या एका साथिदारासह मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अरविंदला साई मंदिराच्या रस्त्याच्या बाजुला एकट्यात गाठले. त्याच्याशी वाद घातला. ऊस कापण्याच्या कोयत्याने सपासप वार केले आणि पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरविंदला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अरविंदची आई दानिशबाई चंद्रकुमार वर्मा (५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ताठे यांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.