Khasdar Sanskrutik Mahotsav in Nagpur
नागपूर: नागपूरच्या विविध ३०५ शाळांमधील ५२ हजारांवर विद्यार्थ्यांनी आज (दि.८) एकाच वेळी एका स्वरात गीता पठण केले. या कार्यक्रमाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. खासदार महोत्सव आयोजन समितीला यासंदर्भातील प्रमाणपत्र देण्यात आले.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने रेशीमबागेतील ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा एक भाग म्हणून रोज सकाळी आध्यात्मिक तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज सकाळी याचा शुभारंभ झाला. नितीन गडकरी, कांचन गडकरी यांच्यासह परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी, समितीचे अध्यक्ष अनिल सोले यांच्या विशेष उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव समिती आणि गीता परिवाराने आयोजित केलेल्या सामूहिक गीता पठण कार्यक्रमात भाग घेतला.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, "ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की या अनोख्या आणि ऐतिहासिक उपक्रमाची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे. या उपक्रमात भगवद्गीतेचे १२ वे, १५ वे आणि १६ वे अध्याय एकत्रितपणे पठण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे, या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कृती, अध्यात्म आणि एकतेचा संदेश दिला आहे.
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला दिलेला संदेश आजही तितकाच प्रासंगिक आणि प्रभावी आहे जितका त्यावेळी होता. या सामूहिक गीता पठणात भारतीय संस्कृतीच्या वैभवाचे, युवाशक्तीचे संघटन आणि आध्यात्मिक जागरणाचे भव्य प्रदर्शन दिसून आले आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर संस्कृतीचा उत्सव आणि आत्मजागरणाचा अनुभव असल्याचे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.