नागपूर; पुढारी वृत्तसेवा : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली खरीप आढावा बैठक रखडली होती. शुक्रवार १२ मे रोजी या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
हंगाम तोंडावर असताना शेतकºयांकडून शेतामध्ये वखरणीसह हंगातील विविध कामांना गती देण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत या हंगामासाठी प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला जिल्हास्तरीय बैठकच झाली नसल्याने शासन-प्रशासनाला या बैठकीचा विसर तर पडला नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी कृषी विभागाने ४ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र विदर्भातील पांढरे सोने म्हणून प्रसिध्द असलेल्या कपाशीचे २.२५ लाख हेक्टर असणार आहे. त्याखालोखाल धान (भात)चे ९२ हजार, सोयाबिनचे ८९,४०० हेक्टर, तूरीचे ५५ हजार हेक्टर आदी पिकांचा यात समावेश आहे. या हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे, खतांचे नियोजनाची तयारी प्रशासनस्तरावर चालविण्यात आली आहे. गत महिन्यात विभागीय खरीप आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. आता शुक्रवारला जिल्हास्तरीय आढावा बैठक होत आहे. या बैठकीनंतर राज्यस्तरीय बैठक पार पडणार असल्याचे सांगण्यात येते.