विदर्भ

नागपूर: दोन मृत्यूनंतर स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला आढावा

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :  स्वाईन फ्ल्यूने दोघांचे मृत्यू झाल्यामुळे स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे शुक्रवारी (दि.२५) शहरातील स्वाईन फ्ल्यूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे झालेल्या दोन मृत्युचे विश्लेषण करण्यात आले. यात 1 रुग्ण नागपूर ग्रामीण व दुसरा नागपूर शहरातील आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे झाल्याचे निष्पन्न झाले.

महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्रा.डॉ. सुहास गजभिये, आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी डॉ. शितल मोहने उपस्थित होते.

यावेळी एकूण 8 संशयित इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले. 5 मृत्यू इन्फल्युएंझा एच 1 एन 1 मुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 60 वर्षावरील रुग्णांची संख्या 5 इतकी होती. यापैकी 2 महिला व 3 पुरुष होते. सहव्याधी असणारे व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांची फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळताच योग्य ते उपचार सुरु करावेत. इन्फल्युएंझा ए लसीकरण डोस घ्यावा, वैयक्तिक स्वच्छता जसे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरने हात निर्जंतुकीकरण करणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार स्पर्श होणा-या वस्तू, जागा निर्जंतुकीकरण करा. आपणास फ्ल्यू सदृष्य लक्षणे असल्यास घरीच थांबावे, गर्दीत जाऊ नका, भरपूर विश्रांती घ्या. व भरपूर पाणी प्या. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असण्याऱ्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT