विदर्भ

सी-20 परिषदेसाठी नागपूर सज्ज; विद्युत रोषणाईसह, चौकाचौकात झळकले विविध देशांचे ध्वज

backup backup
नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  जी-20 अंतर्गत सी-20 या जागतिक परिषदेसाठी 29 देशांचे 250 प्रतिनिधी नागपुरात दाखल होत आहेत. यानिमित्ताने नागपूर शहर सज्ज झाले आहे.  शहराच्या सिव्हिल लाईन्स परिसरात ठिकठिकाणी जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज दिमाखात फडकत असून झाडांवर विद्युत रोषणाईने क्षणभर आपण नागपुरात आहोत की परदेशात असे वाटत आहे. झिरो माईल परिसर चकाकला आहे. विमानतळ ते वर्धा रोडमार्गे सिव्हील लाईन्स परिसर रंगलेल्या भिंती, आकर्षक सजावट, लोककला,आदिवासी संस्कृती, विदर्भातील सांस्कृतिक ठेवा असे सारेकाही नागपूरकराना या भव्यदिव्य आयोजनाची महती सांगत आहे.
रस्त्याच्या दुभाजकावर  पथदिव्यांच्या खाबांवर तसेच सी-20 परिषदेच्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज लावण्यात आले आहेत. वर्धा रोड, विमानतळ परिसर चकाकला आहे. जीपीओ चौकापासून देवगिरी चौक, भोले पेट्रोलपंप, उच्च न्यायालय आणि विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेले हे ध्वज पादचारी आणि वाहनाने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जीपीओ आणि विधानभवन चौकात उभारण्यात आलेले आकर्षक ग्लोसाईन बोर्डही आकर्षणाचा विषय ठरले  आहे. रात्रीच्या वेळी नागपूरकर सेल्फी काढताना दिसत आहेत.
नागपूर -वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदिवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे लावण्यात आल्याने या परिसरास देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे.  उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान आदिवासींचे लोकजीवन व समृद्ध परंपरा दर्शविणारे धातुंचे आकर्षक देखावे  उभारण्यात आले.
छत्रपती चौक मेट्रो स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा देखावा बसविण्यात आला आहे. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन पीलर दरम्यान पेंच अभयारण्य व प्रकल्पातील प्राणी, मोगली हे प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील पात्र व जैव संपदा साकारण्यात आली आहे.  एकूण 16 प्रजातींचे आकर्षक व डौलदार फुलझाडे रस्त्यावर  लावली आहेत.

पाहुणे नागपुरात घेणार  व-हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद

या परिषदेसाठी येणा-या पाहुण्यांसाठी खास व-हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.   21 मार्च रोजी फुटाळा तलाव येथे फाऊंटन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या शोनंतर तेलंगखेडी गार्डनमध्ये व-हाडी भोजनाचा आस्वाद जी-20 परिषदेचे पाहुणे घेणार आहेत. यात विदर्भातील विविध भागातील प्रसिद्ध असणा-या व्यंजनांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.  21 मार्चला दिवसभर नागरी परिषदेच्या चर्चासत्र, परिसंवादानंतर सायंकाळी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
20 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नोबेल विजेते कैलास सत्यार्थी, भारतीय सांस्कृतिक अनुसंधान परिषद अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, अह महफुचान, सी 20 शेरपा इंडोनेशिया, राजदूत विजय नांबियार सिव्हील इंडिया शेरपा राजदूत अभय ठाकूर आदी उपस्थित राहतील.'नागरी संस्थांची शाश्वत विकासातील भूमिका, जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय' बाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या समारोपास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT