विदर्भ

नागपूर : आमदार होण्यापेक्षा किंगमेकरच्या भूमिकेत राहणे आवडेल : डॉ. बबनराव तायवाडे

मोहन कारंडे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी (दि.१५) राजकीय कलगीतुरा रंगला. तायवाडे यांना आमदार व्हायचे असेल तर काँग्रेस सोडण्याचा सल्ला माजी मंत्री परिणय फुके यांनी दिला. तर काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार यांनी योग्य वेळ आली की आम्हीच तुम्हाला लोकप्रतिनिधी करू, काँग्रेस सोडू नका, असे सांगितले. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तुमचे 'गुडविलच' तुम्हाला विधिमंडळाच्या सभागृहात पाठवेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर तायवाडे यांनी आपल्याला किंगमेकरच्याच भूमिकेत रहायला आवडेल असे सांगितले.

बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सच्चिदानंद शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित अभीष्टचिंत कार्यक्रम पार पडला. यावेळी अनंतराव घारड, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री परिणय फुके, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार दीनानाथ पडोळे, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, माजी मंत्री रमेश बंग, डॉ. अक्षयकुमार काळे आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी गौरव ग्रंथ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना तायवाडे म्हणाले की, अभिजित वंजारी आणि सुधाकर अडबाले निवडून आल्याने आमच्या विचारांचा विजय झाला आहे. वयाच्या सत्तरीकडे वाटचाल सुरू असल्याने आमदार होण्यापेक्षा 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहणे अधिक आवडेल. ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ३० शासनादेश केंद्र व राज्य सरकारकडून काढून घेण्यात यश आले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेकांना केलेली मदत व जोडलेली लोक बघता सर्व काही मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयात तायवाडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. अभिजित वंजारी यांनीही तायवाडे यांच्या सल्ल्यामुळेच आपण आमदार होऊ शकलो, असे सांगितले.

ओबीसी महासंघाच्या कार्यातून बबनराव यांनी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली. वंजारी आणि अडबाले यांच्या विजयामुळे विदर्भात काँग्रेसची पाळेमुळे आजही जिवंत आहेत याची साक्ष मिळते. फक्त पक्ष व उमेदवाराला थोडी ताकद देण्याची गरज आहे. इतक्या वर्षांत आपल्या कार्यातून तुम्ही गुडविल तयार केले आहे. सर्व जुळून आले आणि सर्वांनी साथ दिली तर विधिमंडळाच्या सभागृहात जाणे अवघड नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT