नागपूर, पुढारी वृत्तसेवा : झोपलेल्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन उकळते तेल ओतून तिला जीवे मारणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नागूर यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे या आरोपीचे नाव असून तो पंचशीलनगर येथील रहिवासी आहे. भावना सतीश भिमटे (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, आरोपी सतीश हा कोणताही कामधंदा करीत नसल्याने दोघांचे खटके उडायचे, भावना ही बचत गटातून कर्ज घेऊन दोन मुले आणि पतीअसा संसारगाढा ओढत होती. दरम्यान,कर्जाचे ओझे वाढत होते. त्यातच सतीश हा भावनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडत, तिला मारझोड करायचा, २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास सतीशने गाढ झोपेत असलेल्या भावनाच्या अंगावर उकळते तेल ओतले त्यामुळे ती गंभीररित्या जळाली तिला उपचारार्थ मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले असता १८ एप्रिल २०२२ रोजी ती मरण पावली. प्रारंभी पाचपावली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३०७ आणि नंतर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोपीला अटक करण्यात आली.न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.