विदर्भ

नागपूर : गडकरी यांचाही नव्या वीज प्रकल्पाला विरोध

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोराडी आणि खापरखेडा येथे सध्या असलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ होत असतानाच आता कोराडीत नवे वीज प्रकल्प उभारू नयेत. त्याऐवजी प्रस्तावित प्रकल्प पारशिवनीत हलविण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या प्रकल्पाला विविध क्षेत्रातून, पर्यावरणवाद्यांकडून गेले अनेक दिवस विरोध सुरू असताना आता स्वतः गडकरी यांनीच या प्रकल्पाविषयी ऊर्जा मंत्र्यांना पत्र लिहिल्याने या प्रकरणाला वेगळे महत्व आले आहे.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सध्या ६६० मेगावॅटच्या तीन संचातून १,९६० मेगावॅट वीज निर्मिती होते. याशिवाय जवळच खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून या भागात प्रकल्पांमुळे प्रदूषणाची, आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली असल्याने गेली अनेक वर्षे नवीन वीज प्रकल्पांना विरोध आहे. यासंदर्भात विदर्भ कनेक्टचे दिनेश नायडू यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांनी गडकरी यांची भेट घेतली व कोराडीत होणाऱ्या प्रस्तावित प्रकल्प उभारणीस विरोध केला. काँग्रेस सोशल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष विशाल विलास मुत्तेमवार यांनीही यासंदर्भात ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विरोध केला. या सर्वांची दखल घेत अखेर गडकरी यांनी हा प्रकल्प कोराडी ऐवजी पारशिवनीत उभारा, अशी विनंती करणारे पत्र फडणवीस यांना दिले आहे. त्याऐवजी पारशिवनीत हे प्रकल्प उभारल्यास तेथे रोजगार निर्मिती होईल शिवाय कोराडीतील प्रदूषणाची समस्या देखील कमी होईल, असेही गडकरी यांनी फडणवीस यांच्या यापत्रात नमूद केले आहे.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT