नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सोनेगाव पोलिसानी वर्धा रोडवरील प्राइड हॉटेलमधून राज्यातील जनतेची पर्यटनाच्या निमित्ताने आलिशान हॉटेल्समध्ये थांबण्याचे आमिष देत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीवर कारवाई केली आहे. यामध्ये ७ जणांना अटक केली आहे.
आरोपींमध्ये 1)सलीम सरकार 2)रश्मी सिंग 3)आकाश कोहली 4)अजय कश्यप 5)विशाल रॉय 6)जतिन विजय शर्मा 7)सौरभ नारायण चंद्र बकास, सर्व राहणार नोएडा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. पोलिस तपासात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रानुसार फिर्यादींना आरोपींनी लक्झरी कंट्री हॉलिडेज नावाचे कंपनीतर्फे भारतातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था कंपनीतर्फे केल्या जाईल अशी ऑफर सांगून दहा टक्के पेमेंट करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी 25,500 रुपयांचे आगाऊ पेमेंट केले. दरम्यान, दिलेल्या वेळेत उर्वरित पैसे न भरल्याने फिर्यादींची मेंबरशिप रद्द झाली परिणामी फिर्यादीने आधी भरलेल्या पैशाची मागणी आरोपीकडे केली असता आरोपीनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.अखेर आपली फसवणूक झल्याचे समजल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली.