नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात आज (दि. १५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, नागपूरच्या एका दृष्टीहीन मुलीने स्वातंत्र्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. ईश्वरी पांडे असे या 13 वर्षीय मुलीचे नाव आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल अडीच किलोमीटर अंतर पोहत जात या तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी केली आहे.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होते. गेल्या चार वर्षापासून ईश्वरी अनोखे झेंडावंदन सातत्याने करीत आहे. एकीकडे आज बहुतांशी सर्वसामान्य माणूस, नोकरदार वर्ग स्वातंत्र्यदिन आणि सलग आलेल्या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटन, देवदर्शन करण्यास गेलेले असताना ज्यांनी आपला देश कसा हे आपल्या डोळ्यांनी बघितले नसताना डोळसानाही लाजविणारी ही कामगिरी म्हणता येईल.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ईश्वरीने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. तलावाच्या काठावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तलावाच्या मध्यभागी राष्ट्रगीत आणि भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद असा जयघोष राष्ट्रप्रेम जागविणाराच होता.
हेही वाचा