विदर्भ

Chandrapur Murder : पहाटेच्या सुमारास पत्नीचा कुऱ्हाडीने खून; मुलींवरही जीवघेणा हल्ला

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने निर्दयीपणे खून करुन दोन चिमुकल्या मुलींनाही जीवनाशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी (माल) या गावी आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. आशा मनोज लेनगुरे (40) असे मृत पत्नीचे तर अंजली मनोज लेनगुरे (17), पुनम मनोज लेनगुरे (12) असे जखमी मुलींचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, पोंभुर्णा तालुक्यातील डोंगर हळदी (माल) येथील आरोपी पती मनोज लेनगरे हा रहिवाशी आहे. मनोज याने पत्नी आशा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होत होते. सोमवारी (दि. ५) रात्री सर्व कुटुंब जेवणानंतर झोपी गेले. पहाटेच्या सुमारास पत्नी आशा व दोन मुली अंजली, पुनम ह्या झोपेत होत्या. याचा फायदा घेत पती मनोज याने सर्व प्रथम पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला. त्यानंतर झोपेत असलेल्या मुली अंजली व पुनम यांच्यावरही कुऱ्हाडीने वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. मंगळवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची   माहिती सकाळी सर्वत्र पसरली. त्यानंतर लगेचच याची उमरी पोतदार पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत जागीच ठार झाली होती तर दोन्ही मुली गंभीर जखमी आढळून आल्या. गंभीर जखमी दोन्ही मुलींना चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचा पती मनोज लेनगुरे (40) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाचा पती मनोज लेनगुरे (40) याला अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT