विदर्भ

टीकेचा स्तर घसरला, ही आपली संस्कृती नाही : खा. श्रीकांत शिंदे

रणजित गायकवाड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात आज टीकेचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राची वेगळी संस्कृती होती, मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सावरलेले नाहीत. विरोधक सकाळपासून शिव्या शाप देण्यात धन्यता मानत आहेत. खरेतर सोबत असलेले विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करतात. त्यामुळे हे एका विचार धारेने सोबत आले नाही, फक्त सत्तेसाठी सोबत आल्याचे स्पष्ट होते. आता त्यांची वज्रमुठ राहते की वज्रझूठ ठरते हे येणा-या दिवसांत सर्वांनाच समजेल, असा टोला शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी लगावला. पूर्व विदर्भाच्या दौऱ्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मंगळवारी खासदार शिंदे यांनी कार्यकता मेळावा घेतला. शासकीय योजनांची जत्रा उपक्रमात सविस्तर माहिती घेतली, घराघरात शिवदूत योजना नेण्याचा संकल्प करण्यात आला.

खा. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. 'कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोक करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी 25 वर्षे तेच केले आहे. असा टोला त्यांनी लगावला. विदर्भ दौऱ्यावर येण्याविषयी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात लक्ष आहे, कुठलाही भाग दुर्लक्षित होऊ नये, विदर्भाला सुद्धा न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत.'

लोकांना जे हवे होते ते सरकार स्थापन झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले. वातावरण बदलले आहे. जनतेला हे आपले सरकार वाटत आहे. लोकांना सरकारकडून अपेक्षा आहेत या शब्दात पदाधिकाऱ्यांचे मेळाव्यात कान टोचले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ आशिष जैस्वाल, आ. नरेंद्र भोंडेकर, किरण पांडव, मंगेश काशीकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT