विदर्भ

मराठा समाजाचे आंदोलन : जालन्यात पाच दिवसांत नेमके काय घडले ?

दिनेश चोरगे

जालना; पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे यासाठीच मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. तथापि, राज्य सरकारने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जरांगे- पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तरीही आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम होते. गेल्या पाच दिवसांत नेमके काय घडले, त्याचा हा घटनाक्रम…

२९ ऑगस्ट : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्यासह ८ जण आमरण उपोषणाला बसले. यात मधुकर मापारी, अर्जुन काटकर, महेश खोजे, गंगुबाई तारख, संभाजी गव्हाणे, विशाल झांजे व प्रकाश सोळंके यांचा समावेश होता.

३० ऑगस्ट : आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय हवा, अशी भूमिका जरांगे-पाटील यांच्यासह महिलांनी घेत उपोषण सुरू ठेवले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे- पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

३१ ऑगस्ट : उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वडीगोद्री गाव बंद ठेवण्यात आले. शहागड साष्ट पिंपळगाव, तीर्थपुरी, अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीही शुक्रवारी गाव बंदची हाक दिली. वडीगोद्री ग्रामपंचायतने गुरुवारी ग्रामसभेत ठराव संमत करून गावात कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनी जागृती फेरी काढून आंदोलकांना पाठिंबा दिला. शहागडच्या व्यापारी महासंघानेही या बंदला पाठिंबा दिला.

१ सप्टेंबर : उपोषणामुळे आंदोलकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पोलीस त्यांना उपचारांसाठी नेण्यासाठी आले. जरांगे-पाटील यांच्याशी पोलीस अधीक्षक डॉ. राहल खाडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली. तरीही तोडगा निघाला नाही. पोलिसांची फौज वाढल्याने आंदोलनस्थळावर आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. पाठोपाठ पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत आंदोलकांवर लाठीमार केला. यात ३० ते ४० जण आणि १५ ते २० पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. शुक्रवारी रात्रीच छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली. उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले.

SCROLL FOR NEXT