वर्षभरात गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नरभक्षक वाघाने आतापर्यंत १४ निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. यास जबाबदार असणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली. त्यांनी भयग्रस्त नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिली आणि प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
'वनविभागाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात अनेक वाघ आणून सोडले. परंतु त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे वाघ अन्नाच्या शोधात शेत शिवारात येऊन निष्पाप शेतकरी व शेतमजुरांना ठार करीत आहेत. तालुक्यात नरभक्षक वाघाचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत एकट्या गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाने १४ निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.' असे देवराव होळी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 'यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलने करुनही वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. निष्पाप लोकांच्या मृत्यूला केवळ वनाधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.' डॉ.देवराव होळी यांनी मृतकांच्या परिवारातील एका सदस्यास शासकीय नोकरी देऊन किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी केली.