भंडारा : पुढारी वृत्तसेवा : आठवडाभरापूर्वी भंडारा शहरात बिबट्या आल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या अफवेची चर्चा संपत नाही तोच शहरात प्रत्यक्षात बिबट्या दिसल्याने प्रचंड दहशत पसरली आहे. वरठी मार्गावर असलेल्या जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परिसरात सुरक्षा रक्षकाला बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने तात्काळ या परिसराला भेट दिली असून ड्रोन आणि ट्रॅप कॅमे-याच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आयटीआय परिसरात सुरक्षारक्षक विनायक देशमुख यांना चौकीच्या समोरील गवतामध्ये बिबट्या दिसला. हा बिबट्या 12 ते 18 महिन्यांचा असावा, असा अंदाज आहे. बिबठ्या दिसल्याची माहिती वन विभागाला मिळताच उपवनसंरक्षक राहूल गवई, भंडाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर, फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, मानद वन्यजीव रक्षक नदीम खान, शाहीद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क आढळून आले आहेत. तसेच या परिसराला लागून असलेल्या शासकीय दुग्ध विभागाच्या भिंतीवर बिबट्याचे केस मिळाले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी मिळाली आहे. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे. तसेच ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. या परिसरापासून नागरिकांनी अंतर ठेवावे तसेच सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी व वन विभागाने केले आहे.