विदर्भ

भंडारा: मुदतवाढीनंतरही संपूर्ण धान खरेदी अशक्य: धान उत्पादक शेतकरी हताश

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे धान आधारभूत केंद्रांवर विकण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची असलेली मुदत वाढवून १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. परंतु, जिल्ह्यात झालेले धानाचे उत्पादन आणि मिळालेली मुदतवाढ यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने दिलेल्या मुदतीतही संपूर्ण धान खरेदी अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धान खरेदीला १५ फेब्रुवारीनंतरही मुदतवाढ देण्याची नामुष्की शासनावर येणार आहे.

भंडारा जिल्ह्यात १० नोव्हेंबर २०२२ पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्याला सुरुवातीला ४१ लक्ष ८८ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दीष्ट मिळाले होते. हे उद्दीष्ट कमी असल्याने पुन्हा वाढीव २ लाख ७० हजार क्विंटल असे एकूण ४४ लक्ष ५८ हजार खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. ही खरेदी २८० धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून पार पडली. आतापर्यंत जवळपास ४० लक्ष क्विंटलपर्यंत खरेदी पुढे सरकली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार अंदाजे ६५ ते ७२ लक्ष क्विंटल खरेदीची गरज आहे. त्या तुलनेत ४४ लक्ष धान खरेदीचे उद्दीष्ट अपुरे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. धान खरेदीसाठी जिल्ह्यातील १ लक्ष २६ हजार ७१६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लक्ष १७ हजार २८१ शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री केली आहे.

गोडावूनचा अभाव, पोर्टलवर नोंदणीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, ऑनलाईनचा खोळंबा आदी कारणांमुळे आधीच धान खरेदी प्रभावित झाली आहे. त्यातच दिलेल्या मुदतीतच धान खरेदीची भूमिका शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आधी धान खरेदीची प्रक्रिया सुटसुटीत करा, जेणेकरुन शेतकरी विनात्रास धान विकू शकेल. परंतु, नानाविध अडचणी निर्माण करुन शेतकऱ्यांना मर्यादा आणि मुदतीची अट घालून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

आता १५ फेब्रुवारीपर्यंत धान खरेदीची मुदत देण्याचा आदेश ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला. त्यामुळे जेमतेम १३ दिवसात शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत केंद्रांवर विकावे लागणार आहे. त्यातही अनेक अडचणी येणार असल्याने त्या मुदतीत संपूर्ण धान खरेदी शक्य होणार नाही. त्यामुळे पुन्हा धान खरेदीला मुदतवाढ देण्याची नामुष्की शासनावर येणार आहे. धान खरेदीचा हा गौडबंगाल ३१ मार्चपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT