हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात गरजू रुग्ण येतात, त्यांना आरोग्य सेवा देताना कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि. २६) दिला आहे.
शासकीय रुग्णालयात दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. दीपक मोरे, डॉ. बालाजी भाकरे, डी. एस. चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी दानवे यांनी रुग्णालयातील वार्डात जाऊन पाहणी केली. त्यानंतर रुग्णांशी संवाद साधला. या ठिकाणी आरोग्य सेवा वेळेत मिळते का याची विचारणाही त्यांनी रुग्णांना केली. त्यानंतर डायलीसीस विभागात जाऊन पाहणी केली तेथेही रुग्णांची चौकशी केली.
शासकीय रुग्णालयात येणारे गरजू रुग्ण असतात, त्यांना वेळेत आरोग्य सेवा मिळाली पाहिजे याकडे लक्ष द्यावे. रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही. रुग्णालयाच्या काही अडचणी असतील तर लगेच सांगा त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. रुग्णालयातील रिक्तपदे, आवश्यक असलेल्या यंत्र सामुग्री याची माहिती देण्याच्या सुचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.