File Photo  
गोंदिया

विधानसभेत राष्ट्रवादी ८० ते ९० जागांवर लढवणार : प्रफुल्ल पटेल

दिनेश चोरगे

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण ५७ आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता महायुतीतून आपल्या पक्षाकरीता विधानसभेच्या ८५ ते ९० जागा मागण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या जागांवर लढणार असल्याचे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. तसेच गोंदिया विधानसभेतही पक्षाला जागा मिळविण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खा. पटेल गोंदियात आले असता रविवारी (दि.१६) गोंदिया येथील नमाद महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहरराव चंद्रिकापूरे उपस्थित होते.

खा. पटेल यांनी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे व डॉ. नामदेव किरसान यांचे अभिनंदन करून हे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर महाराष्ट्रात एनडीए मागे राहण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो, अशी खंतही प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित यश आले नाही. महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील, विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र बदलेल, असा विश्वास खा. पटेल यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल त्यांना विचारणा केली असता लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राहिलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येईल, असेही पटेल यांनी सांगितले.

मंत्रीपद मलाच मिळणार

केंद्रात मंत्रीपदला घेऊन महायुतीत सकारात्मक चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्रीपद आले तर ते मलाच मिळणार तर योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असेही खा. पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT