Gondia city police have arrested the accused who stole.
चोरी केलेल्या आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. Pudhari Photo
गोंदिया

गोंदिया : पेट्रोल पंपावर दरोडा घालणारे पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : मुर्री येथील साई पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करून पेट्रोल विक्रीचे 12 हजार 300 रुपये चोरून नेणार्‍या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल विनोद धकाते (वय.25 रा. श्रीनगर गोंदिया) आणि आनंद ऊर्फ लालबाल राजेश नागपुरे (वय.27 रा. दांडेगाव) संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल राजकुमार गोंडाणे हे शनिवारी (दि.13) साई पेट्रोल पंप येथे कामावर होते. तेव्हा दुपारच्या दरम्यान कुणाल धकाते आणि आनंद नागपुरे यांनी राहूल यांच्याकडून त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरुन घेतले. पेट्रोलपंपावर त्याच्यामध्ये आपसात भांडण करण्यास सुरवात केली. यावेळी राहूलने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही संशयित आरोपींनी राहूलला मारहाण केली. तसेच ड्राव्हर मध्ये ठेवलेले पेट्रोल विक्रीचे 12 हजार 300 रुपये बळजबरीने पळवून नेले. पोलिसांनी संशयित आरोपी कुणाल धकाते व आनंद नागपूरे यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनीही संगणमत करुन गुन्हा केल्याचे कबुल केले. याप्रकरणाचा तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.

46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तक्रार दाखल होताच गुन्हा नोंद करून तपास केला. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर आरोपींकडुन रोख 6 हजार 400 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

SCROLL FOR NEXT