विवाहबाह्य अनैतिक संबंधातून पतीचा खून, पत्नीला जन्मठेप, प्रियकराची निर्दोष  File Photo
गोंदिया

विवाहबाह्य अनैतिक संबंधातून पतीचा खून, पत्नीला जन्मठेप, प्रियकराची निर्दोष सुटका

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा

विवाहबाह्य अनैतिक संबंधातून आपल्या पतीचा खून केल्याप्रकरणी गोंदियाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने (गुरुवार) ( दि. ३) दिलेल्या निकालात आरोपी पत्नीला जन्मठेपेसह सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर तिच्या संशयित आरोपी प्रियकराला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. शारदा मुनेश्वर पारधी ( वय २८ वर्षे, रा. बाघोली, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी पत्नीचे नाव असून कुणाल मनोहर पटले ( रा. बाघोली ता. तिरोडा जि. गोंदिया) असे निर्दोष सुटलेल्या संशयित प्रियकराचे नाव आहे.

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बाघोली येथील मृत मुनेश्वर सहेशराम पारधी याची पत्नी आरोपी शारदा पारधी हिचे गावातीलच आरोपी कुणाल याच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. यात मृत मुनेश्वर हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी मृताची पत्नी आरोपी शारदा व तिचा प्रियकर कुणाल या दोघांनी संगनमत करून कट रचला. दरम्यान, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास मृत मुनेश्वर झोपेत असताना त्याच्या डोक्यावर व शरिरावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आले होते.

यावेळी आरोपी शारदाने गावातीलच मृत मुनेश्वरची मावशी सायत्राबाई बाबुलाल बघेले व मावसभाऊ प्रदिप बाबुलाल बघेले यांना फोनद्वारे मृतकाची प्रकृती बरोबर नसल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या शरिरावर घाव पाहून व आरोपी शारदाचे विवाहबाह्य संबंधांविषयी मृतकाची मावशी सायत्राबाईला कल्पना असल्याने तिने व तिच्या मुलाने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दवनीवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी सविस्तर तपास करून दोन्ही आरोपीविरूध्द कलम ३०२, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला. यावरून आरोपींना अटक करून दोन्ही आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार व मृतक पक्षातर्फे अति. सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकुण १४ साक्षदारांची साक्ष नोंदवून इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी क्र. १ शारदा मुनेश्वर पारधी (वय २८ वर्षे, रा. बाघोली) हिला भारतीय दंड विधानाचे कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी क्रमांक २ कुणाल मनोहर पटले ( रा. बाघोली) यास पुराव्यांअभावी संशयाचा फायदा देवून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात पोलीस पैरवी कर्मचारी श्रीकांत मेश्राम, पो.स्टे दवनीवाडा यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT