गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची वर्णी लागली आहे. विद्यमान पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाईक यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी प्रामुख्याने तब्येतीच्या कारणास्तव आपण पालकमंत्री पद सोडत असल्याचे सांगितले आहे. यापुढे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा संपूर्ण कार्यभार इंद्रनील नाईक सांभाळतील.
पाटील यांच्या राजीनाम्याच्या नेमक्या कारणावरून मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांनी जरी तब्येतीचे कारण पुढे केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्तक्षेपाची चर्चा जोर धरत आहे. या चर्चेला कारण म्हणजे, नुकत्याच झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पक्षाच्या पालकमंत्र्यांवर टीका केली होती. "पालकमंत्री फक्त सहलीला येतात," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पालकमंत्री त्यांच्या कामात कमी पडत असल्याचे सूचित केले होते. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे, ही नाराजीच कारणीभूत ठरली की त्यांनी खरोखर तब्येतीमुळे पद सोडले, याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विकासाची आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी आता इंद्रनील नाईक यांच्या खांद्यावर आली आहे.