महामार्गावर लुटमार करणारे आंतरराज्यीय चोरटे जेरबंद  File Photo
गोंदिया

महामार्गावर लुटमार करणारे आंतरराज्यीय चोरटे जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा

रायपूर ते नागपूर महामार्ग क्र. ५३ नैनपूर, कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रक मधील जबरीने डिझेल चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्यप्रदेश राज्यातील मंडला जिल्ह्यातून अटक केली आहे. हिमांशु ऊर्फ पुटटु राजकुमार विश्वकर्मा (वय १९ रा. वार्ड नं. १५, खेरमाई मोहल्ला, नैनपूर, जि. मंडला, (म.प्र.) व सलमान बशीर खान (वय २७ रा. राजीव कॉलनी, देवदरा, मंडला (म.प्र) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २ चारचाकी वाहनासह ५६.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी ट्रक चालक प्रदिप मोतीलाल यादव (वय ३६ रा. चकनायक जादावावर देवारा, जादीद किटा पोलीस स्टेशन महाराज गंज ता. सागरी जि. आजमगड, उत्तप्रदेश) हा ट्रक क्र. एम.एच ४०/एके- २५५७ ने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड पहाडी वरून आयरन मिट्टी घेऊन रायपूरकडे जात होते. २४ सप्टेंबर रोजी रात्री १.४० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नैनपूर येथे एका पेट्रोल पंपाजवळ थांबला असता, २० ते २५ वर्षे वयोगटातील ४ अनओळखी संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या वाहनाने त्याच्या ट्रक जवळ आले. त्यातील एका संशयित आरोपीने ट्रकवर चढून फिर्यादीला धमकावून शिवीगाळ केली. तर इतरांनी ट्रक मधुन अंदाजे १६ हजार १०० रुपयांचा १७५ लिटर डिझेल जबरीने चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व डुग्गीपार पोलीस पथकातर्फे गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला. ज्यामध्ये फिर्यादीने संशयित आरोपींचे सांगितलेले वर्णन, गोपनीय बातमीदाराने दिलेली माहिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत व चोरट्यांचे तांत्रीक विश्लेषण माहितीच्या आधारे महामार्गावर ट्रक चालकांना धमकावून डिझेल चोरी करणार्‍या टोळीतील अट्टल गुन्हेगार आरोपी हिमांशु ऊर्फ पुटटु राजकुमार विश्वकर्मा व सलमान बशीर खान या दोघांना नैनपूर जि. मंडला ( मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता, दोघांनीही त्यांचे ईतर ५ साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले. जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी डूग्गीपार पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास डूग्गीपार पोलीस करीत आहेत.

५६.१४ लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयित आरोपींना अटक करून तांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी वाहन, डीझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण ५६ लाख १४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे.

इतर राज्यातही गुन्हे दाखल

दोन्ही जेरबंद कऱण्यात आलेले चोरटे हे अट्टल सराईत गुन्हेगार असून त्‍यांच्यावर ईतर जिल्ह्यात व राज्यात जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर त्यानुसार सविस्तर तपास करण्यात येत असून टोळीतील इतर संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT