नवेगावबांध : पिकअपने पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.२६) बाराभाटी मार्गावरील भारती बारसमोर दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. मृतांमध्ये आई, पाच महिन्याच्या चिमुकल्यासह शेजारील तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. अपघातात पती गंभीर जखमी असून त्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चितेश्वरी संदिप पंधरे (वय २५), मुलगा संचित संदिप पंधरे (वय ५ महिने) घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अर्जुनी मोर तालुक्यातील येरंडी येथील संदिप राजू पंधरे (वय २९) हा तरूण मोटारसायकलवरून (क्रं.एम.एच.३५ ए एम २७५६) पत्नी चितेश्वरी, मुलगा संचित व घराशेजारील मुलगी पार्थवी यांच्यासह नवेगावबांधकडे निघाला होता. बाराभाटी-नवेगावबांध मार्गावरील भारती बारजवळ त्याची मोटरसायकल आली असता पाठिमागून भरधाव येणाऱ्या पिकअपने त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात चितेश्वरी, संचित व पार्थवी या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर संदिप गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी संदिपला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात नातेवाईकांसह येरंडी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने येरंडी गावात शोककळा पसरली आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता चाफले याप्रकरणी तपास करत आहेत.