Gondia News 
गोंदिया

Gondia News: प्रदूषणामुळे पांगोली नदी विषारी; 40 गावांच्या जलस्त्रोत्रावर होणार परिणाम

मोनिका क्षीरसागर

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया, आमगाव व गोरेगाव या तीन तालुक्यासाठी जीवनदायिनी समजल्या जाणार्‍या पांगोली नदीचे पाणी प्रदूषणामुळे विषारी झाले आहे. पाण्याचे रंग हिरवा व पिवळा झाला असून दुर्गंधी सुटली आहे. जनावरांनाही पिण्यासाठी ते अयोग्य ठरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तीनही तालुक्यातील 40 गावातील जलस्त्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पांगोली नदीचे उगमस्थान गोरेगाव तालुक्यातील तेढा गावाच्या तलावातून झाले आहे. या नदीचा संगम वाघ नदीशी झाला आहे. नदीच्या काठावर गोरेगाव, गोंदिया आमगाव तालुक्यातील 40 गावे वसली आहेत. या नदीतून हजारो हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध केले जाते. तसेच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या नदीला जिल्ह्याची जीवनदायिनी म्हटले जाते. परंतु या नदीत विविध मार्गावरुन दुषित जल सोडले जात आहे. तसेच अतिक्रमण होत असल्याने व दुरुस्ती न झाल्यामुळे नदी नाल्यामध्ये परावर्तीत झाली आहे. थोडा पाऊस आला तरी अडथळ्यांमुळे नजीकच्या गावात पाणी शिरते. सामाजिक संस्थांकडून नदीच्या स्वच्छता व खोलीकरणाची मागणी होत असतानाही प्रशासन व शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
नदी पात्र कोरडे पडल्यास त्याचा परिणाम या गावांतील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षापूर्वी नदीच्या पुनरुत्थानासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या सुचनेवरुन पाटबंधारे विभागाने प्रस्ताव तयार केला होता. तो मंजुरीसाठी वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. आमदारांनीही नदीला वारंवार भेट देत दुरुस्तीच्या वल्गना केल्या. मात्र तो प्रस्तावच गुंडाळला गेला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, या दुर्लक्षामुळे कधीकाळी जीवनदायिनी म्हणून ओळख असलेली पांगोली नदी आजघडीला विषारी ठरू लागली आहे.
आठ वर्षांपासून पाठपुरावा….
पांगोली नदीच्या बचावासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने आठ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी अनेकदा बैठक, चर्चा होऊन निवेदनही दिले. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम तिन्ही तालुक्यातील 40 गावांतील सिंचन व पिण्याच्या पाण्यावरही झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT