गोंदिया

गोंदिया : नवेगाव नागझिऱ्यात पुन्हा एका वाघिणीचे आगमन 

backup backup
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढावी वनाचे संतूलन कायम राहावे यासाठी वन्यजीव विभागातर्फे अन्य वनक्षेत्रातून नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ६ वाघ सोडण्यात येत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात दोन वाघिाणींना सोडण्यात आल्यानंतर आज, गुरुवारी (ता़११) संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित आणखी एका वाघिणीला सोडण्यात आले आहे़
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सहक्षेत्रात २० वाघांची क्षमता आहे़ परंतू सद्य:स्थितीत येथे केवळ १२ ते १३ वाघ असल्याचे सांगण्यात येत असून वाघांची संख्या वाढावी, जंगलातील वाघांची संख्या वाढवून जंगलाचे संतूलन राखण्यासोबत पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात ६ वाघिण सोडण्याची योजना आहे़ या अंतर्गत पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी २० मे रोजी वनमंत्राच्या उपस्थित दोन वाघिणींना सोडण्यात आले होते़ याच माहिमेंतर्गत ताडोबा अंधारी येथे १० एप्रिल २०२४ रोजी जेरबंद करण्यात आलेल्या एनटी-३ वाघिणीला दुसऱ्या टप्यात आज ११ एप्रिल रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ़ प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आहे़ दरम्यान, जिल्ह्याच्या व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एक नवीन पाहुणीचे आगमन झाले असल्याने वन्यप्रेमी व पर्यटकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे़

वाघिणीवर २४/७ ठेवणार नियंत्रण…

नवेगाव-नागझिऱ्यात एनटी-३ वाघिणीला सोडण्यात आल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हीएचएफच्या मदतीने या वाघिणीवर २४/७ नियंत्रण ठेवले जाणार आहे़ तर या वाघिणीच्या स्थिरतेनंतर इतर वाघिणींना सोडण्याचे नियोजन असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे़

पर्यटकांना होणार व्याघ्रदर्शन…

जगात सर्वात जास्त वाघांची संख्या भारतात आहे. त्यात भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या महाराष्ट्रात असून सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. गुरूवारी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीला सोडण्यात आल्याने आता या व्याघ्र प्रकल्पातही वाघांची संख्या वाढणार असून पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची मेजवानी मिळणार आहे़

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT