Former MLA Ramesh Kuthe built Shivbandhan
गोंदियात भाजपला धक्का, शिवसेना ठाकरे गटाला बळ Pudhari Photo
गोंदिया

गोंदियात भाजपला धक्का, शिवसेना ठाकरे गटाला बळ

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात भाजपला पुन्हा मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेकडून दोनदा आमदार राहिलेले व सद्या भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज, ( ता. २६) पक्षप्रवेश केला. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात विशेषतः गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर कुथे यांच्या घरवापसीने विदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे ताकद वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेची तिकीट मिळावी यासाठी जिल्ह्यातही प्रमुख पक्षातील इच्छुक फिल्डिंग लावून आहेत. अशावेळी कुथे यांच्या घरवापसीने शिवसेना व महाविकास आघाडीचे हाथ मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून कुथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची माहिती आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 14 जून रोजी मध्यरात्री कुथे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच कुथे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात रंगल्या होत्या.

मात्र, आता कुथे यांनी शिवबंधन बांधल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम लागलेला आहे. माजी आमदार कुथे यांनी मुंबई येथे मातोश्री गाठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रसंगी त्यांचे लहान बंधू जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजु कुथे व शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवबंधन बांधले आहे.

यावेळी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख पंकज यादव, शैलेष जायस्वाल, उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार, तालुका प्रमुख चुनेश पटले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार कुथे यांच्या शिवसेनेत घरवापसीने जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार असून त्यांच्या घरवापसीने शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला निश्चितच लाभ मिळणार आहे.

सहा वर्षानंतर भाजपला रामराम...

माजी आमदार रमेश कुथे हे 1995 आणि 1999 दोन वेळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून लांब होते. दरम्यान, 2018 मध्ये कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी सहा वर्षानंतर भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत घरवापसी केली.

जिप सभापती रुपेश कुथेंच्या भूमिकेकडे लक्ष...

माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी त्यांचे लहान बंधू दुग्ध संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजू कुथे यांनीही पक्ष प्रवेश केला. असे असले तरी त्यांचे चिरंजीव व गोंदिया जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे हे, यावेळी मुबंईत उपस्थित असतानाही त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही. त्यामुळे रुपेश कुथे यांची भूमिका सुध्दा येत्या काळात महत्वाची राहणार आहे.

SCROLL FOR NEXT