विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना अधिकारी Pudhari Photo
गोंदिया

गोंदिया : आवास योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याची बाजी

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुक्रवार (दि.६) गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभघाटे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, आस्थापना उपायुक्त विवेक इलमे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील सरपंच, पंचायत समिती सभापती, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी बिदरी यांनी, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल उभारण्यात आली. उर्वरित १२ हजार घरकुलांचे उद्दिष्टयही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १५ सप्टेंबर रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-दोन’ अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरीत होणार आहे. नागपूर विभागातील ८० हजार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही हा लाभ जमा होणार आहे. त्यासाठी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांनी १०० टक्के नोंदणी केली असल्याचे सांगून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेतंर्गत विभागात १४ हजार ८०० भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित ४०० लाभार्थ्यांनाही लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे बिदरी यांनी सांगितले.

जिल्ह्यांच्या श्रेणीत गोंदियाची बाजी...

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याला प्रथम, भंडारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुरुगानंथम एम. यांनी गोंदिया जिल्ह्याचा तर गंगाधर जिभकाटे यांनी भंडारा जिल्ह्याचा पुरस्कार स्वीकारला. राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. चंद्रपूरला द्वितीय तर वर्धा जिल्ह्याला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

तालुक्यांमध्ये रामटेक सरस...

केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने सरस कामगिरी केल्यामुळे या श्रेणीतील दोन्ही पुरस्काराने या तालुक्यास सन्मानित करण्यात आले. केंद्र पुरस्कृत योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीने पहिला, गोंदिया पंचायत समितीने दुसरा तर रामटेक पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समिती प्रथम, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर द्वितीय तर रामटेक पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

ग्रामपंचायत श्रेणीत वर्धा जिल्हा अव्वल

केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गौरविण्यात आलेल्या एकूण ६ पैकी वर्धा जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. केंद्र पुरस्कृत आवास योजनेत वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील काजळी ग्रामपंचयतीला प्रथम तर आष्टी तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा ग्रामपंचयतीला प्रथम तर आष्टी तालुक्यातील दैलवाडी ग्रामपंचायतीला द्वितीय आणि कारंजा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT