उज्वल मेश्राम खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटकेची मागणी Pudhari File Photo
गोंदिया

उज्वल मेश्राम खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटकेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कुंभारेनगरामध्ये जुन्या वैमनस्यातून उज्वल मेश्राम (वय.17) वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. ही घटना 18 जून रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र, हत्या घडवून आणणारा मुख्य आरोपी मोकाटच असून पोलीस त्याला हाताशी घालत असल्याचा आरोप मृत उज्वलच्या आई-वडीलांसह कुटुंबियांनी केला आहे. मुख्य आरोपीस तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.5) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्र, राज्य शासनाला निवेदन पाठविले आहे.

निवेदनानुसार, उज्वल मेश्राम हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अंकीत गुर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकीत याने हत्या प्रकरणातील सोबती राहूल शेंडे, हर्ष, प्रणय नागदेवे, साहील गवरे, हितेश भिमटे, गोलू उर्फ मोळा मुरली यादव यांचे नाव सांगितले आहे. या आरोपींनी उज्वलच्या हत्येची सुपारी घेतल्याचे सांगून मुख्य आरोपी कल्लू यादव याचे नाव घेतले होते. मात्र, पोलिसांकडून आतापर्यंत कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, कल्लू यादव याच्यावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारात उज्वलचा काका प्रशांत याचा हात असून त्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप मेश्राम कुटुंबियांनी निवेदनातून केला आहे. आरोपीला राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलिस आरोपीला पाठीशी घालत आहेत. तेव्हा या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच उज्वलच्या खूनीला अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी उज्वलच्या कुटुंबीयांनी त्याच्या घर परिसरातील नागरिकांसोबत मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, केंद्रिय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकायुक्त, मानवाधिकार आयोग, पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन पाठविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT