पिंडकेपार गावातील परिस्थिती Pudhari Photo
गोंदिया

गोंदिया : पिंडकेपार गावात घरांची पडझड; अख्या गावाचे अस्तित्व आले धोक्यात!

प्रशासनाकडून मदत मिळण्याची गावकऱ्यांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : प्रमोदकुमार नागनाथे

गोरेगाव तालुक्यांतील कटंगी मध्यम प्रकल्पांच्या पाण्यामुळे पिंडकेपार गावांतील घरांना ओल येत असल्यामळे घरांची पडझड होत आहे. हा प्रकार गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. दरम्यान, याच दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून गावाचे सर्वे करून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, शासनालाच केलेल्या सर्वेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी गावातील अनेक घरांना ओल आले असून संपूर्ण पिंडकेपार गावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

गोरेगाव तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा, नागरिकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जानेवारी 1983 रोजी कटंगी मध्यम प्रकल्प जलाशयाच्या बांधकामासाठी मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया यांनी अधिसूचना जारी केली होती. 1990 मध्ये बांधकाम सुरू झाले. दरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पिंडकेपार गावातील शेतकऱ्यांची १२३.२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. अशा प्रकारे पाथरी गावातील शेतकऱ्यांची सुद्धा १३२.१५ हेक्टर आणि कटंगी गावातील शेतकऱ्यांची ११.०१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.

त्यातच जलाशयाचे बांधकाम पूर्ण झाले व जिल्ह्यातील 2 हजार 453 हेक्टर शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या सर्व नियोजनात कमी भावात मोबदला देऊन शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या. त्यामुळे अनेक शेतकरी प्रकल्पग्रस्त झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होती, त्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी शेती खरेदी केली, परंतु प्रकल्पग्रस्तांपैकी ९० टक्के शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली नाही, परिणामी ते शेतकरी अजूनही भूमिहीन आहेत. तर नोकऱ्यांअभावी प्रकल्पग्रस्त बेरोजगार झाले आहेत. त्यात भरीसभर , आता गेल्या तीन ते चार वर्षांपासून या जलाशयाच्या पाण्यापासून नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

गावात 438 कुटुंबियांचे वास्तव्य

पिंडकेपार गावाची जनसंख्या अडीच हजारांहून अधिक असून तेथे ४३८ कुटुंबे राहत आहेत. यामधील ५० टक्के घरांच्या भिंती ओल्या असल्याने ही घरे कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. राहण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे गावकऱ्यांना जीर्ण घरांमध्येच राहावे लागत आहे.

कटंगी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे गावातील घरांना ओलावा येत आहे. ही समस्या मागील चार ते पाच वर्षापासून सुरू झालेली आहे. भिंतींना ओल येत असल्यामुळे अनेक घरे जीर्ण झालेली असून घरांची पडझड होत आहे. दरम्यान, पक्के घर बांधण्यासाठी पुनर्वसन अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 15 लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात यावे.
- भरत घासले, उपसरपंच, ग्रामपंचायत पिंडकेपार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT