गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही एसटी बससा भिषण अपघात झाला. यात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबिंयांच्या दु:खात सहभागी आहे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात (Gondia Shivshahi Bus Accident) झाला आहे. भंडारा-गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनास्थळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.