गोंदिया

प्राणी गणना : नवेगाव-नागझिऱ्यात १२ वाघांचे दर्शन; १९८५ प्राण्यांची नोंद

निलेश पोतदार

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा दरवर्षी बौध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभाग व वन विभागाच्या वतीने नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना करण्यात येते. यंदा बौध्द पौर्णिमेची प्रकाशमय रात्र निसर्गप्रेमींसाठी पर्वणीची ठरली. २३ मे रोजी जंगल परिसरात उभारण्यात आलेल्या विविध मचानावरुन करण्यात आलेल्या प्राणी गणनेत सर्वश्रेणीचे वन्यप्राणी दिसून आले. ज्यामध्ये १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली असून, प्रकल्पात वन्यप्रेमींना १२ वाघोबांचे दर्शन करता आले.

दरवर्षी बौध्द पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात प्राणी गणना केली जाते. दरम्यान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत पिटेझरी, नागझिरा, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कोका या क्षेत्रात गणना पथक कार्यरत करण्यात आले. तर जंगल शिवारात विविध मचान उभारून प्राणी गणना करण्यात आली. या गणना प्रक्रियेत वाघ, बिबट, रानकुत्रा, हरीण, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, रानगवे, निलगाय, सांबर, चितळ, वानर, मोर, साळींदर, रानमांजर, उदमांजर, भेटकी, तडस, हळद्या, कोकीळा, सनबर्ड, घार, चौसिंगा, पॅगोलियन, ससा, लाल तोंड्या माकड, गरूड, रान कोंबडा आदि प्राणी पहावयास मिळाले.

एंकदरीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन परिसरात सर्व वर्गीय १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली. तर महत्वाचे म्हणजे, या गणनेत १२ वाघ दिसून आले. यामुळे नागझिरा व्याघ्रप्रकल्प परिसर वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

अशी आहे प्राणी संख्या…

बौध्द पौर्णिमेच्या रात्री घेण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदीत

१२ वाघ, १८ बिबट, ८२ रानकुत्रे, ७५ अस्वल, १२८, रानडुक्कर, ६४ मुंगूस, ७२० रानगवे, ७१ निलगाय, ५० सांबर, ११५ चितळ, १६ हरीण, ३८६ वानर, ११६ मोर, ७ साळींदर, १ रानमांजर, १० उदमांजर, १६ भेटकी, एक हळद्या, ५ कोकीळा, १ सनबर्ड, १ घार, ३ चौसिंगा, ८१ लाल तोंड्या माकड, ३ गरूड, २ रान कोंबडा याप्रमाणे प्राण्यांची नोंद झाली आहे.

पर्यटकांत होणार वाढ…

नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्रण्यांची संख्या विशेषतः वाघांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींसाठी आगामी काळात आकर्षणाचा केंद्र राहणार आहे, असा विश्वास संबंधित विभागाकडून केला जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT