Bear In Gondiya PWD Office
सार्वजनिक बांधकाम विभागातील अस्वल Representative Photo
गोंदिया

गोंदिया : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अस्वलाचा ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

जंगल व्याप्त परिसरात वन्यप्राण्यांचा वावर राहत असतानाच आता शहरी भागातही वन्यप्राणी प्रवेश करू लागले आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशनगर परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एका अस्वलाने आपला ठिय्या मांडल्याची घटना शुक्रवारी (दि.24) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल पाच तासाच्या रेस्क्यूनंतर बेशुद्ध करून त्या अस्वलाला पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले. मात्र, या सर्व घटनाक्रमादरम्यान अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

पावसाची रिपरिप अन् अस्वल...

सकाळी गणेशनगर परिसरात अस्वल आल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली. तर त्याच वेळेवर पावसाचेही आगमन झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पावसामुळे अस्वलाला पकडणे जिकरीचे ठरत होते. दरम्यान, बंदुकीच्या सहाय्याने अस्वलाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

वैद्यकीय तपासणीनंतर मुक्त...

अस्वलाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला वन विभागाच्या कार्यालयात घेऊन जात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्या अस्वल ला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.

SCROLL FOR NEXT