प्रातिनिधिक छायाचित्र   File Photo
गोंदिया

इंस्टाग्राम आयडीवरून वाद : चौघांचा पाठलाग, १२ वीतील विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेत संपविले जीवन?

Gondia Crime News | तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील १७ वर्षांच्या मुलाला इंस्टाग्राम आयडी डिलीट करण्यासाठी एकोडी येथील चाकू आणि रस्सी घेऊन आलेल्या चार तरुणांनी धमकावले. ही घटना २३ मार्चरोजी घडली होती. या धमकीमुळे तणावात आलेल्या मुलाने गावातीलच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. विवेक छगनलाल भैरम (१७, रा. जमुनिया, ता. तिरोडा) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. (Gondia Crime News)

१२ वीची परीक्षा नुकतीच दिलेला विवेक भैरम सध्या घरीच असायचा. २३ मार्चच्या सायंकाळी ४ वाजता एकोडी येथील ४ मुले विवेककडे आली. विवेकला धमकी देत त्याला शेतावर घेऊन गेले. काही वेळाने विवेक घरी परतला; परंतु तो दहशतीत होता. यासंदर्भात आईने विचारल्यावर त्याने त्या मुलांना मित्र असल्याचे सांगून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता ती चार मुले चाकू आणि गाडीला रस्सी बांधून पुन्हा आली. त्यावेळी विवेकची आई घरीच होती. आईने विवेक घरी नसल्याचे त्या मुलांना सांगितले.

विवेक काही वेळाने घरी येताच तेथे उभी असलेली ती चारही मुले त्याला धमकावत होती. त्याच्या मागे धावली. त्यानंतर विवेक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह मिळाला. धमकीला घाबरून विवेक ने गावातीलच विहिरीत उडी घेतली की त्याला विहिरीत ढकलले? असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. यावर त्याच मुलांनी माझ्या मुलाची हत्या केली, असा आरोप विवेकच्या आई-वडिलांनी केला आहे.

विवेक हा शांत स्वभावाचा लाजाळू मुलगा होता, घरात एकच मोबाईल होता. बहिणीच्या लग्नानंतर तो मोबाईल विवेक कडे आला. आणि त्या मोबाईलने अशी कोणती आयडी त्यांनी तयार केली. ज्यामुळे हा वाद निर्माण झाला, तो वाद विकोपाला गेला. त्या इंस्टाग्राम आयडी वरून चार तरुणांनी त्याला धमकावले. आणि हा सोशल मीडिया विवेकच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. काही दिवसा अगोदर एका मुलीने विवेक चा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्यावर 'आय लव यू' असे लिहिले होते. त्यावेळी त्याच्या बहिणीने त्या मुलीला ठणकावले होते, असे विवेकच्या बहिणीच्या पतीने सांगितले. त्यामुळे या प्रकरणातून या वादाला सुरुवात झाली का? असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे.

सोशल मीडियाचा हा वाद त्या इंस्टाग्राम आयडीमुळे सुरू झाला. मात्र, इंस्टाग्राम आयडी कुणाची होती? आणि इंस्टाग्राम आयडी डिलीट करण्याकरता दबाव टाकण्यात आला, तर ती आयडी अनधिकृत फेक आयडी होती का? हे प्रश्न अनुत्तरीत असले तरी विवेक ने कोणाची फेक आयडी तयार केली होती का ? असा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शांत स्वभावाच्या विवेकने असे काही करू शकतो का? असा प्रश्न मित्र समीर कोलटकर, शेजारी गीता पटले यांनी उपस्थित केला आहे.

शाळेत सर्वात शांत आणि प्रामाणिक असलेला विवेव असे कसे काय करू शकतो. कुणाशीही वाद न घालणारा, कुणाला उलट उत्तरे न देणारा असा हा विद्यार्थी असे टोकाचे पाऊल का उचलतो ?असा सुद्धा प्रश्न शाळेतील वर्गशिक्षिका चैताली वनचुरे यांनी उपस्थित केला आहे.

आयडी डिलीट कर अन्यथा ठार मारू! ४ युवकांनी दिली धमकी

एकोडी येथील चार मुलांनी जमुनिया येथील विवेक याला मोबाइलवरून इंस्टाग्राम आयडी कशी बनवली? ती आयडी डिलीट कर; नाहीतर, तुला ठार करू, अशी धमकी दिली. विवेकच्या मोबाइलमधील दोन्ही सिम कार्ड काढून ती मुले घेऊन गेली. धमकी देणाऱ्यांनी त्याला ठार केले की, त्या धमकीमुळे घाबरल्याने विवेकने स्वतःच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब स्पष्ट झालेली नाही. परंतु, ही आत्महत्या असल्याचे पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी सांगितले. या घटनेची तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT