विदर्भ

गोंदिया : ट्रक-चारचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू; ६ जण जखमी

अविनाश सुतार

गोंदिया: पुढारी वृत्तसेवा : ट्रक व चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील एका वृद्धाचा जागीच मृत्यू, तर दोन जणांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वानऊच्या सुमारास कोहमारा ते गोंदिया मार्गावरील पाटेकुर्रा येथे घडली. श्यामसुंदर किसनलाल बंग (वय ७८, रा. गोरेगाव), अंबिका गोकुळ पांडे (वय ६३, रा. चिरचाडी, ता. सडक अर्जुनी) व सूरज शंकर मुनेश्वर (वय २४, रा. कालीमाटी, ता. आमगाव) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, काळी-पिवळी (एमएच ३६/३१११) चारचाकी कोहमारा येथून प्रवासी घेऊन गोंदियाकडे जात होती. तर ट्रक (एमएच ४०/ वाय ८४८७ ) गोंदिया येथून कोहमाराकडे जात होता. पाटेकुर्राजवळ ट्रकचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक चारचाकीवर जाऊन आदळला. यात चालकाच्या बाजूला बसलेले श्यामसुंदर बंग यांचा जागीच मृत्यू झाला.

अंबिका गोकूळ पांडे, सूरज शंकर मुनेश्वर, साकीर अली अकबर अली (वय ४९, रा. सडक अर्जुनी), वनिता अनिल भेंडारकर (वय २८, रा. चिखली), मनीषा पवनलाल चिखलोंढे (वय २५, रा. गोंदिया), प्रणोल सतीश राठोड (वय १५, रा. भुसारीटोला) व अन्य दोन असे आठजण जखमी झाले.

यातील जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना अंबिका पांडे आणि सूरज मुनेश्वर यांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT