Childbirth of a woman who crossed the canal from JCB's bucket
जेसीबीच्या बकेटमधून नाला पार केलेल्या महिलेची प्रसुती  Pudhari Photo
गडचिरोली

गडचिरोली : जेसीबीच्या बकेटमधून नाला पार केलेल्या महिलेची प्रसुती

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : पूर परिस्थितीमध्ये प्रसुतीकळा सुटल्यानंतर रुग्णालयात जाण्यासाठी जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची नामुष्की ओढवलेल्या झुरी मडावी नामक महिलेची शुक्रवारी (दि.19) रात्री साधारण प्रसूती झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुरुवारी (दि.18) कुडकेली येथील झुरी संदीप मडावी (वय. 20) या महिलेला प्रसुती कळा सुटल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी सांगितले होते. तेव्हा तिला ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घेऊन कुडकेली गावाकडे प्रयाण केले होते. परंतु, वाटेत नाल्याला पूर आल्याने आणि रस्ता खचल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे आशा वर्कर संगीता शेगमकर गावकऱ्यांच्या मदतीने झुरी मडावी हिला ३ किलोमीटर अंतरावरील नाल्यापर्यंत घेऊन आल्या. त्यानंतर तेथे कामावर असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसून झुरी मडावीला नाला पार करावा लागला होता.

त्यानंतर तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झुरीची साधारण प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले. रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपस्थित असून, व्हेंटीलेटरसह अन्य अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT