गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : आरमोरी तालुक्यातील धानपिकाचे नुकसान केल्यानंतर आता रानटी हत्तींचा कळप गडचिरोली शहराच्या सीमेवर दाखल झाला आहे. रविवारी (दि.२९) संध्याकाळी या हत्तींनी सेमाना देवस्थानानजीक रस्ता ओलांडून मुडझा-पुलखल परिसरात मुक्काम ठोकला आहे. अनेक नागरिकांनी हत्तींचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. (Gadchiroli News)
अडीच-तीन वर्षांपूर्वी २८ ते ३० रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेकडील कोरची तालुक्यात दाखल झाले होते. त्यानंतर धानोरा, कुरखेडा, देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात या हत्तींनी उच्छाद मांडला होता. काही काळ या भागात वास्तव्य केल्यानंतर हे हत्ती छत्तीसगडमार्गे परत जातात आणि पुन्हा या जिल्ह्यात येतात, असा अनुभव आहे. मागील महिनाभरापासून हे हत्ती कुरखेडा आणि आरमोरी तालुक्यात भटकत होते. तेथील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाचे नुकसान केल्यानंतर हे हत्ती गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील जंगलात आले. त्यानंतर नदी ओलांडून त्यांनी ६ किलोमीटर अंतरावरील वाकडी गावाच्या जंगलात प्रवेश केला. (Gadchiroli News)
रविवारी संध्याकाळी हे हत्ती वाकडी येथून गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मुडझा गावाच्या जंगलाच्या दिशेने जाताना अनेक नागरिकांना दिसले. त्याचा व्हिडिओही व्हायरल केला. या कळपात मोठे हत्ती आणि पिल्लू असे एकूण २८ हत्ती असून, सध्या ते पुलखल गावानजीकच्या पॉवर प्लाँट परिसरात आहेत. वनविभाग त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परिसरातील गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांनी ‘ दै. पुढारी’शी बोलताना सांगितले.