Two Men Drowned : अंत्यसंस्कारासाठी गेलेले दोघे पुरात गेले वाहून; चौथ्या दिवशी सापडले मृतदेह file photo
गडचिरोली

Two Men Drowned : अंत्यसंस्कारासाठी गेलेले दोघे पुरात गेले वाहून; चौथ्या दिवशी सापडले मृतदेह

सोनपूर गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली:  नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या दोन व्यक्तींचा पुरात वाहत जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरची तालुक्यातील बेळगाव-पुराडा नाल्यावर घडली. चार दिवसांच्या शोधानंतर आज (२६ जुलै) दोघांचेही मृतदेह आढळून आले. मृतांची नावे तलवारशहा मडावी (४५) आणि देवसाय मडावी (६०) असून, ते दोघेही सोनपूर येथील रहिवासी होते.

२३ जुलै रोजी कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी हे दोघे गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून परत येताना, पुराडा- बेळगाव दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने त्यांनी मोटारसायकलसह नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा जोर जास्त असल्याने ते दोघेही मोटारसायकलसह वाहून गेले. हे दृश्य मागून येणाऱ्या प्रवाशांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ बेळगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरू केली. मोटारसायकल रस्त्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर सापडली, मात्र दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता. मोटारसायकलच्या नंबरवरून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आणि सोनपूर गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी सरपंच मोहन कुमरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस शोधमोहीम राबवली. अखेर, आज चौथ्या दिवशी दोघांचे मृतदेह आढळून आले.

या दुर्दैवी घटनेमुळे सोनपूर गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या गावातील दोन व्यक्तींवरच अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग गावकऱ्यांवर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT