गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पोलिसांनी गांजाची साठवणूक करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ५०.५ किलो गांजा, ज्याची बाजारमूल्य सुमारे ५ लाख ५ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनेगाव येथील कालीदास पांडुरंग मोहुर्ले (४०) आणि कातलवाडा येथील भुपाल चांग (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी (ता. २४) स्थानिक गुन्हे शाखेला कालीदास मोहुर्ले याने आपल्या घरी गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धनेगाव येथे छापा टाकून दोन पांढऱ्या पोत्यांमध्ये ४०.८२५ किलो गांजा (किंमत ४ लाख ८ हजार २५० रुपये) जप्त केला.
चौकशीत कालीदासने हा गांजा विक्रीसाठी असल्याची कबुली दिली. दरम्यान, कातलवाडा येथील भुपाल चांग याच्या घरीही गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तपासात एका पोत्यात ९ किलो ६७८ ग्रॅम गांजा (किंमत ९६ हजार ७८० रुपये) आढळून आला. भुपाल चांग यानेही हा गांजा विक्रीसाठी असल्याचे मान्य केले.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५०.५ किलोग्रॅम गांजा, किंमत ५ लाख ५ हजार ३० रुपये, जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर पुराडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक आकाश नाईकवाडे करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, गोकुळ राज, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक अरुण फेगडे, सहायक निरीक्षक समाधान दौड, भगतसिंह दुलत, सरिता मरकाम, नाईक चौधरी, गरफडे, गोंगले, चव्हाण, कोडापे, दुधबळे, पंचफुलीवार, लोणारे, देवेंद्र पिदूरकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.