Gadchiroli Adivasi Education Issues
गडचिरोली : दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी एटापल्ली तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या भेटीदरम्यान समोर आले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज एटापल्ली तालुक्यातील कोसा आलेंगा, कोहका आणि डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन पाहणी केली. कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत असली, तरी ती जीर्ण अवस्थेत असून शिक्षक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी गावातील तीन विद्यार्थिनींना सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील कोहका येथील शाळेत जंगलातून पायी जावे लागत आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोहका येथील शाळेत २७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक असून, जागेअभावी पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरविले जात असल्याचे पाहणीत आढळले. दिपके यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कोसा आलेंगा येथील बंद शाळेची साफसफाई करण्यात आली; मात्र शिक्षक नियुक्त करून शाळा नियमित सुरू करण्याचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
डुम्मे येथील शाळेत पहिली ते आठवीपर्यंत ५७ विद्यार्थी असून दोन वर्गखोल्या, दोन शिक्षक व एक मुख्याध्यापक कार्यरत आहेत. वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची सुविधा नसताना कार्यालयात मात्र पंखा असल्याचे निदर्शनास आले. २०२३ मध्ये इमारत जर्जर झाल्याने निर्लेखित करण्याबाबत पत्र देण्यात आले होते; मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले. स्वच्छता गृहाची मागणीही दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे, दिपके यांच्या भेटीच्या एक दिवस आधी डुम्मे शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आली. यावर दिपके यांनी, “एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध होऊ शकते, तर त्यासाठी दोन वर्षे का लागली?” असा सवाल उपस्थित केला.
या पाहणीनंतर दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, “जंगलातून शाळेत येताना एखाद्या विद्यार्थ्यावर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न प्रशासनाला केला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा, पुरेसे शिक्षक, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.