गडचिरोली : पत्तीगाव येथे मुले आजारी असल्यावर रुग्णालयात न जाता अंधश्रद्धेपोटी तांत्रिकाकडे जावून पोटच्या मुलांचा जिव गमावल्याची घटना घडली. चिमुकल्या मुलांना योग्यवेळी योग्य निदान न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे शवविच्छेदन करण्यास आई-वडिलांनी नकार दिल्याने त्यांना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन गावाची वाट धरावी लागली. विज्ञान युगात अंधश्रद्धेने दोघांचा बळी घेतलेली ही घटना बुधवारी (दि.४) सप्टेंबरला पत्तीगाव येथे घडली.
बाजीराव रमेश वेलादी (वय.६) आणि दिनेश रमेश वेलादी(वय.३ ,रा.येरागंडा,ता.अहेरी) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. येरागंडा येथील रमेश वेलादी हे पत्नीसह पोळ्याच्या सणानिमित्त पत्तीगाव येथे साळ्याच्या घरी गेले होते. तेथे बाजीराव व दिनेश यांना ताप आला. परंतु रमेश यांनी दोन्ही बालकांना डॉक्टरांकडे नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले. पुजाऱ्याने जडीबुटी दिली. परंतु दोन्ही बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती आणखीनच बिघडत गेली. सुरुवातीला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठा मुलगा बाजीरावचा मृत्यू झाला आणि दीड तासाने लहान मुलगा दिनेशही दगावला. त्यानंतर रमेश वेलादी यांनी पत्नी आणि नातेवाईकांसह जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केले.
तेथे शववाहिका उपलब्ध नसल्याने देचलीपेठा आरोग्य केंद्रातून ती उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचे निदान होण्यासाठी शवविच्छेदन होणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु रमेश वेलादी यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर पती-पत्नीने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेत वाटेतील चिखल तुडवीत पत्तीगावची वाट धरली. बरेच अंतर पायी गेल्यानंतर नातेवाईकांच्या मोटारसायकलने ते पत्तीगावला पोहचले. ज्या लेकरांना आपल्या अंगाखांद्यावर खेळविले; त्यांचेच मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची पाळी रमेश वेलादी आणि त्यांच्या पत्नीवर अंधश्रद्धेने आणली.
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे पत्तीगावला गेले होते. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर संबंधित पुजाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची प्रक्रिया करु, असे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.आज रुग्णवाहिका घेऊन वैद्यकीय अधिकारी पत्तीगावला पोहचले. त्यांनी दोन्ही बालकांचे मृतदेह घेऊन अहेरीला आणले. तेथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने गावी सोडून देण्यात आले, अशी माहितीही आयुषी सिंह यांनी दिली.