Earthquake in Gadchiroli 
गडचिरोली

Earthquake in Gadchiroli | दक्षिण गडचिरोलीत भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भयभीत

लोहखनिज खाण आणि कोळसा खाणी असलेल्या भागातच अलीकडच्या काळात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा व अहेरी तालुक्यात बुधवारी (ता.२५) रात्री १२ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. काल बुधवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सिरोंचा तालुक्यासह अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली व अन्य ठिकाणच्या नागरिकांना जमिनीला कंपने जाणवली.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने या भूकंपाची नोंद घेतली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील रामगुंडमपासून ३५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली. गोदावरी नदीच्या खोऱ्यात असलेले सिरोंचा व अहेरी हे तालुके तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणामुळे धोक्यात आले आहेत. शिवाय या दोन्ही तालुक्यांना लागूनच लोहखनिज खाण आणि कोळसा खाणी असल्याने त्या भागात अलीकडच्या काळात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत.

२०२४च्या भूकंपाची तीव्रता अधिक

मागील पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात पाच वेळा भूकंपाचे धक्के सहन करावे लागले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती. त्यानंतर ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ही मागील वेळच्या दोन्ही भूकंपापेक्षा अधिक म्हणजे ५.३ रिश्टर स्केल एवढी होती. त्याचे धक्के गडचिरोली शहरासह शेजारचा चंद्रपूर जिल्हा आणि छत्तीसगड राज्यालाही बसले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदूदेखील तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे होता. त्यानंतर काल रात्री पुन्हा जिल्ह्याच्या दक्षिण भागात भूकंपाचे धक्के बसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT