Chief Minister Youth Work Training
सोनाली गेडाम  Pudhari Photo
गडचिरोली

गडचिरोली : सोनाली गेडाम ठरली पहिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची लाभार्थी

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीची झाली आहे. धानोरा येथील सोनाली गेडाम हिने बी.एस्सी आणि एम.एस्सी आयटीचे शिक्षण घेतले आहे. या योजने अंतर्गत तिला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तिला ६ महिन्यांपर्यत दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. नागपूर विभागासाठी या योजनेंतर्गत २९ हजार ५०० उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ हजार ८४७ उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी (दि.25) बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या योजने अंतर्गत खासगी आणि शासकीय अशा ८० आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून, विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने पहिली नियुक्ती केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयालक्षमी बिदरी यांनी गडचिरोली जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले असून, इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT