Tiger 
गडचिरोली

Gadchiroli news | 20 दिवसांनंतर आढळला शेतकऱ्याचा सांगाडा, वाघाने ठार केल्याचा अंदाज

घटनास्थळी सांगाडा, मानवी अवशेष्, कपडे व बैल बांधण्याची दोरी इत्यादी साहित्य आढळून आले

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : हरविलेले बैल शोधण्यासाठी जंगलात गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा सांगाडा २० दिवसांनंतर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. वाघाने त्यास ठार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धर्माजी पांडुरंग कस्तुरे (वय-७७ वर्षे, रा. मौशीखांब, ता. गडचिरोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

धर्माजी कस्तुरे हे २ मार्च रोजी शेतातून हरविलेले बैल शोधण्यासाठी जंगलात गेले होते. परंतु संध्याकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु ते आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. अखेर ११ एप्रिलला गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील शिवारात मानवी सांगाडा आढळून आला. शरीराचे अवशेष इतरत्र विखुरलेले दिसले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी सांगाडा, मानवी अवशेष्, कपडे व बैल बांधण्याची दोरी इत्यादी साहित्य आढळून आले. वस्तूंच्या आधारे धर्माजी कस्तुरे यांचा मुलगा व नातेवाईकांनी सांगाडा धर्माजी यांचाच असल्याचे सांगितले.

घटना घडली त्या भागात वाघ व बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे धर्माजीवर वाघ किंवा बिबट्याने हल्ला करुन फरफटत नेले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी हाडांचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतरच धर्माजी कस्तुरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT