गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वैनगंगा व अन्य नद्यांच्या रेती घाटातून बेकायदेशीरपणे रेती तस्करी होत आहे. त्यामुळे शासनाचा सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केला आहे. रेती तस्करांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Gadchiroli Sand Smuggling)
वाघोलीसह अन्य रेती घाटांमधून पोकलेन व जेसीबीद्वारे पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रेतीचा उपसा केला जात आहे. ही रेती, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांसह शेजारच्या तेलंगणा राज्यात पाठवली जात आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सांगूनही कारवाई न झाल्याने आतापर्यंत राज्य शासनाचा सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे डॉ.देवराव होळी यांचे म्हटले आहे.
नदीतील रेती ही लोकांच्या हितासाठी आहे. परंतु काही तस्कर सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करीत आहेत. यावर तत्काळ आळा घालावा, अशी मागणी होळी यांनी केली आहे. डॉ.होळी हे भाजपचे माजी आमदार असून, सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री असून, भाजपचे माजी आमदार होळी यांनी आरोप केल्यानंतर बावनकुळे रेती तस्करांवर काय कारवाई करण्याचे आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी, गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी तसेच चामोर्शी तालुक्यातील वाघोली व वैनगंगेच्या अन्य घाटावरुन मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उपसा करुन वाहतूक केली जात आहे. ही रेती बेभाव विकून सामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसविला जात आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.