Sonam Wangchuk Support Protest
गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि पेपर फुटीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२०) गडचिरोलीत शेकडो विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.
आज दुपारी ३ वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात शेकडो विद्यार्थी गोळा झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शहीद बिरसा मुंडा, सोनम वांगचूक, अभिजीत दिपके यांचे पोस्टर झळकवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी 'आवाज दाबला तरी सत्य थांबत नाही', 'आवाज उठेगा, बदलाव आयेगा' अशा घोषणाही दिल्या. 'नीट' पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात धर्मानंद मेश्राम, विवेक खोब्रागडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळू टेंभुर्णे, जी.के.बारसिंगे, भगतसिंह फाउंडेशनचे जावेद खान, शीतल नरवडे, प्रा.अनिल होळी, प्रतीक डांगे, संतोषी सुत्रपवार, सतीश कुसराम, प्रशांत सातार, प्रितेश अंबादे, सोनाशी लभाने, गणेश वरखडे, दिवाकर साखरे, प्रकाश बन्सोड, नितीन वेस्कडे, विश्वरत्न युथ फाउंडेशनचे वृषभ रामटेके, साहिल बोदेले, विवेक बारसिंगे, सोनू कुमरे, शाम रामटेके, रणजित भाई यांच्यासह शेकडो युवक व युवती सहभागी झाले होते.
रविवारी १९ जुलैला ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांचे सुपुत्र अमृत बंग यांच्या 'निर्माण' चळवळींतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी गडचिरोलीत पेपर फुटीविरोधात फलक झळकवत आंदोलन केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाची धग वाढली.