गडचिरोली

दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक

Shambhuraj Pachindre

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा (वय २३) असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव आहे. तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील तोयामेट्टा येथील रहिवासी आहे. अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला काल पेरमिली येथील जंगलातून अटक केली.

सोमा हा कट्टर नक्षल समर्थक आहे. २०२० पासून नक्षल्यांना राशन पुरविणे, नक्षल्यांचे बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता. छत्तीसगडमध्ये झालेला एका इसमाचा खून, ३ चकमकी आणि भूसुरुंग स्फोट व स्फोटके पुरून ठेवण्याच्या ३ घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. २०२३ मध्ये भामरागड तालुक्यातील हिक्केर येथील जंगलात झालेल्या चकमकीत सहभाग असल्याने त्याला अटक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असे पोलिसांनी सांगितले. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ७९ नक्षल्यांना अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT