गडचिरोली

Tiger Skin Smuggling : पोलिसानेच होमगार्डसह केली वाघाच्या कातड्याची तस्करी, वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी केले जेरबंद!

छत्तीसगड राज्यातील घटना, आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील छत्तीसगड राज्यातील बांदे वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या कातड्यासह दोन जणांना पकडून अटक केली. आरोपींमध्ये एक पोलिस शिपाई व होमगार्डचा समावेश असून, दोघेही अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

बिजेश्वर गेडाम असे कॉन्स्टेबलचे, तर बाबूराव मडावी असे होमगार्डचे नाव आहे. छत्तीसगड राज्यातील पश्चिम भानुप्रतापपूर वनमंडळाच्या पथकाला वाघाच्या कातड्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर वनाधिकारी आणि पोलिसांनी मंगळवारी ३० जूनच्या मध्यरात्री महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बांदे वनपरिक्षेत्रात पाळत ठेवली. एवढ्यात एक मोटारसायकल येताना दिसली. पथकातील कर्मचाऱ्यांनी ती थांबवून तपासणी केली असता त्यात असलेल्या एका गोणीत वाघाचे दोन कातडे आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेत कातडे आणि मोटारसायकल जप्त केली.

यातील आरोपी बिजेश्वर गेडाम व बाबूराव मडावी यांना अटक केल्यानंतर त्यांना बुधवारी न्यायालयाने वनकोठडी सुनावली. दरम्यान, वाघाच्या कातड्याच्या तस्करीत पोलिस दलातीलच कर्मचाऱ्यांचाच सहभाग आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

टोळी सक्रिय असण्याची शक्यता?

पोलिस अणि होमगार्डचा वाघाच्या तस्करीत सहभाग आढळून आल्याने सीमावर्ती भागात वाघाची शिकार करुन कातडे विकणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासादरम्यान कातडे मिळविलेल्या वाघांची शिकार कुठे करण्यात आली, आणखी कोणकोणाचा सहभाग आहे, याविषयीचा उलगडा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT