Forest Mushroom Poisoning Gadchiroli
गडचिरोली : पावसाळ्यात रानावनात उगवणारे मशरूम खाण्याचा मोह अनेकांना आवरवत नाही, पण हाच मोह कधीकधी जीवावर बेतू शकतो. असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात घडला आहे. जंगलातून आणलेल्या मशरूमची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
धानोरा तालुक्यातील टवेटोला येथील नैताम कुटुंबासोबत ही घटना घडली. २७ जून रोजी सायंकाळी त्यांनी जंगलातून आणलेल्या मशरूमची भाजी तयार केली. कुटुंबातील सदस्यांसोबतच घरी पाहुणे म्हणून आलेल्या दोन लहान मुलांनीही या भाजीचा आस्वाद घेतला. मात्र, जेवणानंतर काही वेळातच सर्वांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. रात्रीच्या वेळी त्रास अधिकच वाढल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी, विषबाधा झालेल्या पाचही जणांना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये ललीता रामदास नैताam (४५), सपना रामदास नैताम (१६), स्वप्नील रामदास नैताम (२६) आणि कन्हारटोला येथून पाहुणे म्हणून आलेले विद्या देवनाथ नैताम (३) व अक्षर देवनाथ नैताम (१०) यांचा समावेश आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकाची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला गडचिरोली येथे हलवण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार केल्याने आता सर्वांची प्रकृती सुधारत आहे. "सध्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत," अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे यांनी दिली. या घटनेमुळे जंगली मशरूम किंवा भाज्या खाताना ओळख पटवून आणि पूर्ण काळजी घेऊनच खाण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.