गडचिरोली: नेहमीप्रमाणे मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी निघालेली आजची (दि.७) पहाट काटली गावासाठी काळरात्र ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. गडचिरोली-आरमोरी महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात ट्रकने सहा शाळकरी मित्रांना अक्षरशः चिरडले. या हृदयद्रावक अपघातात चार मित्रांचा जागीच अंत झाला, तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको करत आपला आक्रोश व्यक्त केला.
आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास काटली गावातील सहा मित्र फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. महामार्गावरून जात असताना आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्षणात रक्ताचा सडा पडला आणि मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. या दुर्घटनेत पिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दिशांत दुर्योधन मेश्राम (१५) आणि तुषार राजेंद्र मारबते (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पिंकू आणि तन्मय यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिशांत आणि तुषार यांनी रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले. गंभीर जखमी असलेल्या क्षितीज तुळशीदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपरे यांना तातडीने लॉयड मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर निर्दयी ट्रकचालक ट्रकसह फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एकाच गावातील चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळताच काटली गावावर शोककळा पसरली. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वात महामार्गावर 'चक्काजाम' आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या भीषण अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अपघातामुळे केवळ चार कुटुंबेच उद्ध्वस्त झाली नाहीत, तर रस्ते सुरक्षेचा आणि भरधाव वाहनांच्या मुजोरीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील काटली येथे भेट देऊन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवाय अपघात सानुग्रह योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचनाही दादा भुसे यांनी केली. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते.