Machuvancha Forest Maoist Arms Seized Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Maoist Arms Seized | माचुवंचा जंगलात माओवाद्यांनी लपवून ठेवलेली शस्त्रे,स्फोटकांचा साठा जप्त

गडचिरोली पोलिसांची विशेष मोहीम; पाच अग्निशस्त्रांसह क्लेमोर, सुतळी बॉम्ब व माओवादी साहित्य हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

Machuvancha Forest Maoist Arms Seized

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माचुवंचा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा, स्फोटके आणि अन्य माओवादी साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत १२ क्लेमोर, पाच अग्निशस्त्रे, १०० सुतळी बॉम्ब आणि वायरलेस संचासह विविध साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच दोन स्फोटकांसह काही माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

माचुवंचा जंगलात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे कळताच आज पहाटे विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) रवाना करण्यात आले. जवानांनी जंगलात कसून शोधमोहीम राबवून हा साठा शोधून काढला.

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एक १२ बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, एक एअर गन, १२ क्लेमोर, एक बॉटल क्ष-क्यू-एफ स्फोटक, एक जिवंत क्लेमोर स्फोटक, एक वायरलेस माईक सेट, हत्याराचा लोअर हँडगार्ड, १०० सुतळी बॉम्ब तसेच माओवादी गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या हिरव्या कापडाच्या पाच जोड्या यांचा समावेश आहे.

माओवाद्यांकडून यापूर्वी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी तसेच विविध माओवादी कार्यक्रम आणि निवडणुकांच्या काळात अशा शस्त्रसाठ्याचा वापर केला जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले. जप्त केलेल्या साहित्यापैकी धोकादायक स्फोटके व अन्य साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT